Wednesday 13 June 2012

किल्ले अचला

नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम अशी पसरली आहे. या पूर्वपश्चिम पसरलेल्या रांगेमधे अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत. या गिरीदुर्गाच्या मालिकेमधे नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत.


अजंठा-सातमाळा रांगेची सुरवात होते. अचला नावाच्या किल्ल्यापासून. रांगेच्या सर्वात पश्चिमेकडे असणार्‍या अचला किल्ल्याला नाशिकमधून राज्य परिवहनच्या बसेसची सोय आहे. नाशिक ते सापुतारा अशा बसेस
धावतात.


सापुतारा हे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत झाले असून, थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. सापुतार्‍याच्या रस्त्यावर वणी हे प्रसिध्द गाव असून ते सप्तश्रृंगगडाच्या दक्षिण पायथ्याला आहे. वणीच्या पुढे पिंपरी अचला या गावाचा फाटा लागतो. या फाट्यावर उतरुन आपल्याला पिंपरी अचला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. गावच्या उत्तरेलाच समुद्र सपाटीपासून १२५० मीटर उंचीचा अचलाचा किल्ला दिसतो. किल्ल्याच्या पश्चिम अंगाला त्रिकोणी आकाराचा तवल्या डोंगर आपले लक्ष वेधून घेतो.


पूर्वपश्चिम पसरलेला अचला किल्ल्याच्या पूर्वेकडे एक लहानशी खिंड दिसते. या खिंडीमधून अचलावर जाण्याचा सोयीचा मार्ग आहे. गडावर पोहोचेपर्यंत वाटेत पाणी नाही. म्हणून गावातूनच पाणी सोबत नेणे सोयीचे आहे. गावातून अर्ध्या पाऊण तासात आपण खिंडीत पोहोचतो.


खिंडीतून डावीकडे (पश्चिमेकडे) जाणार्‍या वाटेने चढाई सुरु केल्यावर आपण अचलाच्या कड्याजवळ पोहोचतो. अचलाचा माथा डावीकडे ठेवून आपण त्याच्या उत्तरअंगाला येतो. अचलाच्या उत्तरअंगाला येवून पश्चिमेकडे चालत गेल्यावर एका घळीतून माथ्यावर जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाशिवाय अन्य बाजूने अचलागडावर जाण्यासाठी मार्ग नाही.


अचला गडाच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत साधारण दोन तास तरी लागतात. अचलागडाचा डोंगर चारही बाजुने ताशीव असल्यामुळे गडाला संरक्षणाच्या दृष्टीने फारश्या तटबंदीची आवश्यकता नाही. गडाचा हा उत्तर भाग बंदिस्त केल्यास गडाचे संरक्षण होवू शकते. गडावर गडपणाच्या तुरळक खाणाखुणा आपल्याला पहायला मिळतात.


अचलागडापासून तवत्या उत्तम दिसतो. सापुतारा व हातगड उत्तरेकडे दिसतात. दूरवर साल्हेर सालोरा तसेच कंडाण्याचे दर्शन होते. पुर्वेला सातमाळा रांगेतील अहिवंत, सप्तश्रृंगी धोपड इत्यादी किल्ले तसेच रामसेज देहेर ही दिसतात.


गडदर्शनासाठी अर्धातास पुरतो. पुन्हा आल्यावाटेनेच खाली उतरुन खिंड गाठावी लागते. या खिंडीतून अहिवंतगडाला जाता येते अथवा पुन्हा पिंपरीअचला गाठून परतीच्या मार्गाला लागता येते.

कांचनगड

नाशिक जिल्ह्यात दुर्गांची संख्या मोठी आहे. हे दुर्ग गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे असल्यामुळे बेलाग आहेत. यातील अनेक दुर्ग एकेका डोंगर रांगेमध्ये असल्यामुळे दुर्गांची साखळीच तयार झाली आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडे भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्वाची अशी अजंठा-सातमाळा ही डोंगररांग आहे. या डोंगर रांगेची सुरवात अचला नावाच्या किल्ल्यापासून होते. या पूर्व-पश्चिम पसरलेल्या रांगेत अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत.


याच रांगेत माथ्यावर तुरा शोभावा असा सुळका घेवून उभा आहे, तो कांचनगड अथवा कंचना किल्ला. नाशिक-सटाणे मार्ग या सातमाळा रांगेला छेदून जातो. येथे लहानसा घाट रस्ता आहे. या घाटाच्या पश्चिम अंगाला कांचनगड आहे. या घाटाजवळ खेळदरी नावाचे लहानसे खेडे आहे. खेळदरी हे खेडे भाऊ खिंडीच्या दक्षिण पायथ्याशी आहे. नाशिक वडाळाभोई सटाणे अशी एस.टी.ची सेवा आहे. या एस. टी. मार्गाने अथवा चांदवड या तालुक्याच्या गावाकडूनही गाडीमार्गाने खेळदरीपर्यंत पोहोचता येते.


खेळदरीपासून चालत अर्ध्या पाऊण तासात आपण कांचनच्या पायथ्याला पोहोचू शकतो. पायथ्यापासून मळलेल्या वाटेने कांचन मंचनच्या मधील खिंडीत पोहोचेपर्यंत तासभर लागतो. खिंडीच्या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये पाण्याची टाकी कोरलेली आहेत. खडकांमध्ये कोरलेल्या या टाक्यामधील पाणी थंडगार असून पिण्यायोग्य आहे. या गुहेमधून मंचनचे दृष्यही उत्तम दिसते. खिंडीतून काहीश्या घसार्‍यावरुन कसरत करीत आपण कांचनगडाच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर गडपणाच्या काहीश्या खाणाखुणा सोडल्या तर उभी असलेली एकही वास्तू नाही. पाण्याच्या तीन टाक्या आहेत. माथ्यावरचा सुळका चढण्यासाठी सोबत आवश्यक
असे गिर्यारोहणाचे साहित्य पाहीजे.


कांचनावरुन पूर्वेकडे कोळदेहेर, राजदेहेर इंद्राई हे किल्ले तसेच साडेतीन रोडगा नावाच्या सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तर पश्चिमेकडे विखार्‍याचा सुळका लक्ष वेधून घेतो. त्याच बरोबर सातमाळा रांगेतील धोडप, खळा-जवळा, सप्तश्रृंगी, अहिवंत हे किल्ले दिसतात. स्वच्छ हवामानात उत्तरेकडे साल्हेर सालोटा, मुल्हेर, चौल्हेर तसेच कर्‍हेगडापर्यंत डोंगररांग दिसते.


कांचनवरुन पुन्हा खिंडीत येवून आपण मंचनावर चढतो. गडाच्या या भागात मात्र आपल्याला अनेक अवशेष व पाण्याची टाकी पहायला मिळतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची संपत्ती लुटल्यानंतर याच मार्गाने परत फिरत असताना मोगली सरदार दाऊदखान आडवा आला होता. या दाऊद खानाला कांचन किल्ल्याच्या जवळ असणार्‍या भाऊड खिंडीजवळ गाठून महाराजांनी त्याचा सपाटून पराभव केला होता. या पराक्रमाची स्मृती जागवीतच आपण कांचनचा किल्ला उतरतो. पायथ्यापासून धोडप गडाकडे जाता येते अथवा खेळदरीकडे येवून परतीच्या वाटेला लागता येते.

बाळापूर किल्ला

विदर्भातील अकोला हा महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर असून ते बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.

मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याश्या उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे.
या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरुज बांधून संरक्षणाची सिद्धता केलेली आहे. बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे.

या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करुन आहे. याचे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महीरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख तिसरा दरवाजा आहे. यालाही महीरप केलेले आहे.

या तिसर्‍या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करुन त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायर्‍या केलेल्या दिसतात. या पायर्‍यांवरुन चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरुन किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरुन बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करुन देतात.

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजुंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जुन पहावी अशीच आहे.

कान्‍होजींच्‍या कारकीर्दीचा साक्षीदारः सुवर्णदुर्ग

महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न अशा कोकणच्या किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात सुवर्णदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग उभा आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली या तालुक्यामध्ये आहे. दापोली पासून १६ कि.मी. अंतरावर हर्णे बंदर आहे. हर्णे बंदराच्या सागरात सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे.


सुवर्णदुर्ग या जलदुर्गाच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर तीन किनारी दुर्गांची साखळी उभी ठाकलेली आहे. कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा गड हेह सुवर्णदुर्ग किल्याचे उपदुर्ग आहेत.


सुवर्णदुर्गला जाण्यासाठी मुंबई-पणजी महामार्गावर खेड हे तालुक्याचे गाव असून येथून दापोलीला प्रथम यावे लागते. दापोली पासून हर्णे बंदरापर्यंत गाडीमार्ग आहे. हर्णे गावातून गाडी गोवागडाच्या दारातून फत्तेदुर्गापर्यंत येते. हर्णे येथे मच्छिमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. यात अनेक हौशी पर्यटकांचाही सहभाग असतो.


किनार्‍यावर असलेल्या कनकदुर्ग किल्ल्यावर दीपगृह असल्याने तो किल्ला चटकन ओळखू येतो. या कनकदुर्गाच्या पायथ्याशीच धक्का आहे. येथून सुवर्णदुर्गाला जाण्यासाठी होडी मिळू शकते. काही हौशी मच्छिमारांनी एकत्र येऊन आपल्या पाचसहा होड्या सुवर्णदुर्गला जाण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. माणशी काही भाडे आकारुन ते आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्यावर फिरवून आणतात. यासाठी अगोदर चौकशी करणे गरजेचे आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे निघाल्यावर आपण प्रथम कनकदुर्गला वळसा मारुन सागरात प्रवेश करतो. जसे जसे किनार्‍यापासून दूर जावे तसे तसे दूरपर्यंतचा किनारा आपल्याला दिसतो.


सुवर्णदुर्ग किल्ल्याला धक्का नसल्यामुळे बर्‍याच वेळा गुडघाभर पाण्यामध्ये उतरुन पुळणीवर यावे लागते. सुवर्णदुर्ग किल्ल्याची भक्कम तटबंदी अजुनही सुस्थितीमध्ये आहे. किल्ल्याला पूर्वेच्या बाजूला म्हणजे किनार्‍याकडून एक प्रवेशद्वार आहे. तर पश्चिमेकडे सागराकडे एक प्रवेशद्वार आहे. किनार्‍याकडील प्रवेशद्वार पूर्वकडे असले तरी ते उत्तराभिमुख आहे. प्रवेशद्वार बाहेरच्या बुरूजाच्या माण्यामध्ये ठेवलेले आहे.


प्रवेशद्वाराजवळच हनुमानाचे शिल्प आहे. दाराच्या पायरीजवळ कासवाचे शिल्प कोरलेले आहे.


प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या दिसतात. बाजूनेच तटावर जाण्याचा मार्ग आहे. येथून पुढे खूप गच्च रान माजलेले होते. नुकतेच पुरातत्व खात्याने साफसफाई सुरु केल्यामुळे किल्ल्यामध्ये फिरणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. दोन तीन वर्षापूर्वी आत पाय टाकणेही मुश्किल होते. तटबंदीवरुन कशी बशी फेरी मारावी लागायची.


प्रवेशदारातून समोर निघाल्यावर जवळच एक विहिर आहे. विहिरीच्या बाजूला वाड्याचा भक्कम चौथरा आहे. याच्या पुढच्या बाजूला कोठारे आहेत. येथूनच चोर दरवाज्याकडे जाणारी वाट आहे. या पश्चिमेकडील दरवाज्याला पायर्‍या नाहीत. या तटबंदीच्या उत्तर टोकाच्या बुरुजाजवळ दारूचे कोठार आहे. येथून पुन्हा दरवाज्याकडे येताना घरांची जोती लागतात. ही फेरी पूर्ण करायला अर्धा तास लागतो. आता तटबंदीवर चढून आतला आणि बाहेरचा परिसर न्याहाळता येतो.


मराठ्यांच्या इतिहासामध्ये अढळ स्थान प्राप्त करणारा सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६६० मध्ये आदिलशाहीकडून जिंकून घेतला. या किल्ल्याची भक्कम बांधणी महाराजांनी केली. पुढे हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. कान्होजींच्या कारकिर्दीची सुरवात सुवर्णदुर्गावर झालेली आहे. पुढे तळाजी आंग्रे, पेशवे व नंतर इंग्रज असे सत्तांतर होत गेले.


कान्होजी आंग्रे म्हणजे सागरावरचे शिवाजी असे समजण्यात येते. त्यांच्या दैदिप्तमान कारकिर्दीचा साक्षीदार असलेल्या सुवर्णदुर्गाची सहल निश्चित प्रेरणा देणारी ठरेल.

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी
सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली.

असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो.

पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करुन राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करुन टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो.

मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.


गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.


सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स.१६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज १८१२ पर्यंत फडकत होता. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.

अजिंक्य पारगड

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो.
चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्‍यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.


चंदगडाहून निसर्गरम्य परिसरातून प्रवास करीत आपण तासाभरात पारगडाच्या पायर्‍यांशी पोहोचतो. तिनशे पायर्‍या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्‍यांबरोबर शिवकालीन पायर्‍याही आपल्याला आढळतात. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. बाजूलाच हनुमानाच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचे असावे.

येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते. दुतर्फा असलेल्या वस्तीमधून रस्ता गेला आहे. या वस्तीमध्येच रस्त्याच्या डाव्या बाजूला शाळा आहे. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्‍यावर बसविलेला आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पुर्वी गडावरची सदर होती.

येथून समोरच आपल्याला भवानीमातेचे मंदिर दिसते. या मंदिराचा कायापालटच करण्यात आला आहे. शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नविन इमारत उभी करण्यात आली आहे. बांधलेले मंदिर भव्य असून नव्याने शिखर व सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात भवानीमातेची देखणी मुर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात शिवकालातील अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत.


सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. या वेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. बहुदा हे १६७६ साल असावे. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता. त्यावेळी महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करुन आहेत.

इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही.

पारगड किल्ल्याच्या गडफेरीमध्ये आपल्या दृष्टीला निसर्गाची विविध रूपे, दिसतात. गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात. गडावर पोहोचण्यासाठी असलेली सुविधा, निसर्गरम्य परिसर, ऐतिहासीक महत्व, ऐतिहासीक घराणी, जेवणाची व रहाण्याची सोय यामुळे पारगडाला पुन्हा यावेसे वाटले तर नवल नाही. तर मग चला पारगडाला जावूया !

पुरंदर

पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा तालुका आहे. तालुक्याचे गाव सासवड आहे. पुरंदर हे तालुक्याचे नाव पुरंदर या किल्ल्यामुळेच रुढ झालेले आहे. सासवड पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुरंदर किल्ला १५ किलोमीटर आहे. पुणे-पंढरपूर या मार्गावर सासवड आहे.


पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून तीन मार्ग आहेत. पुणे, हडपसर, दिवेघाट मार्गे सासवड वरून पुरंदर तसेच पुणे कोंढवा, बोपदेव घाट मार्गे सासवड वरून पुरंदर किंवा पुणे सातारा या महामार्गावरील कापूरहोळ येथून सासवडकडे जाणार्‍या मार्गावर पुरंदर किल्ल्याकडे जाणारा फाटा आहे. सासवड- कापूरहोळ मार्गावर नारायणपूर आहे. नारायणपूर हे धार्मिक क्षेत्र म्हणून सध्या प्रसिध्द पावलेले आहे. येथून एक किलोमीटर अंतरावर पेठ गाव आहे. गडावर स्वातंत्र्यानंतर सैनिकी प्रशिक्षण शिबिर होते. त्यामुळे पेठ येथून जीपसारखी वाहने पुरंदरच्या माचीवर जावू शकतील असा गाडी रस्ता आहे.


सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्व-पश्चिम असा भुलेश्वर रांगेचा फाटा आहे. या भुलेश्वर रांगेच्या फाट्यालाच बोपदेव घाटाजवळ एक उपरांग फुटते. या उपरांगेवर पुरंदर आणि वज्रगड या किल्ल्यांची जोडी आहे.




पेठ गावातून आपण गडचढाईला सुरूवात करतो. पेठ गावापर्यंत पुरंदर किल्ल्याच्या माचीतून एक डोंगर धार उतरलेली आहे. या धारेवरुन चढाई करुन आपण पुरंदर किल्ल्याच्या माचीमध्ये पोहोचतो. या तीव्र धारेवरुन चढाई करताना आपल्या डावीकडे असलेला वज्रगड किल्ला आपली सोबत करीत असतो. माचीमध्ये आपण बिनी दरवाजाने प्रवेश केल्यावर आपल्याला पेठमधून आलेला गाडी मार्ग लागतो. या दरवाजाच्या जवळच पश्चिमेकडे वीर मुरारबाजी यांचा आवेशपूर्ण भव्य पुतळा आहे.

या नरवीर मुरारबाजी यांच्या पुतळ्यासमोर आपण उभे राहतो, तेव्हा पुरंदरच्या इतिहासाची अनेक पाने आपल्यासमोर उलघडू लागतात. पुरंदर किल्ल्याचा इतिहास यादवकालाच्याही अगोदरचा आहे. यादवकालाच्या अगोदर पासून पुरंदर किल्ला अस्तित्वात असल्याचे दिसून येते. यादव कालात काही काळ यादवांचा ध्वजही पुरंदरवर दिमाखात फडकत होता. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमनानंतर यादवांची सत्ता नामशेष होत असतानाच बहमनी राजवटीची सत्ता स्थापन झाली. पुरंदर किल्ला बहमनी राजवटीत सामील करण्यात आला. बहमनी राज्याची शकले झाली. त्यातून निर्माण झालेल्या पाच शाह्यांपैकी अहमदनगरच्या निजामशाहीने पुरंदर किल्ला आपल्या अखत्यारीत आणला. पुढे निजामशाही इतर शाह्यांनी संपुष्टात आणली. तेव्हा पुरंदर आदिलशहाच्या ताब्यात आला.


शहाजीराजे आदीलशाहीमध्ये दाखल झाले. त्यावेळी पुरंदर किल्ल्यावर हवालदार होते महादजी निळकंठ. या महादजी निळकंठांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पुरंदर किल्ल्याच्या स्वामित्वासाठी महादजी निळकंठांच्या चार मुलांमध्ये वाद सुरु झाला. त्यांच्यामधील भांडणे विकोपाला गेली होती. ही बाब शिवाजीराजांच्या लक्षात आली. या भावांच्या भांडणात आदिलशाहीचा हस्तक्षेप झाला तर ते या चौघांना हाकलून एखादा नवाच हवालदार गडावर नेमतील. महाराजांनी त्यांना समजावले आणि चौघांनाही पुरंदरवरून दूर सारले. त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतले आणि रक्ताचा थेंबही न सांडता पुरंदर स्वराज्यात दाखल करुन घेतला. पुढे स्वराज्यावर चालून येणार्‍या फत्तेखानाला या पुरंदरच्याच सानिध्यात पराभूत करुन महाराजांनी त्याला पळवून लावले.


छत्रपती संभाजी महारांजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरच झाला. तेव्हा नेताजी पालकर किल्लेदार होता. पुढे मुरारबाजी किल्लेदार असताना मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांनी स्वराज्यावर घाला घातला. पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी दिलेरखानाने प्रयत्नांची शिकस्त केली पण पुरंदर आणि दिलेरखान यांच्यामध्ये वीर मुरारबाजी उभा ठाकला होता. दिलेरखानाने हरप्रयत्न करुन वज्रगड हा पुरंदरचा जुळा किल्ला ताब्यात आणला. त्यावर तोफा चढवून दिलेरखानाने पुरंदरवर हल्ला चढवला. पुरंदरच्या माचीवरील तटबंदी फोडून दिलेरखानाचे सैन्य पुरंदरमध्ये घुसले.


मुरारबाजी आणि मावळ यांनी पुरंदरच्या बालेकिल्ल्याचा आसरा घेतला. मोगलांचे सैन्य पुरंदरच्या माचीत घुसलेले पाहून मुरारबाजी आणि निवडक मावळ्यांनी बालेकिल्ल्यातून बाहेर येऊन मोगली सैन्यावर प्रखर हल्ला केला. मोगल सैन्य या हल्ल्यामुळे हतबल झाले. मुरारबाजीच्या पराक्रमाने दिलेरखानही चकीत झाला. या लढाईत मुरारबाजी यांनी भीमपराक्रम गाजवून स्वामीकार्यावर आपले बलिदान दिले. पुढे तहात हा किल्ला मोगलांना मिळाला. पुढे सवाई माधवराव पेशवे यांचा जन्मही पुरंदरवर झाला. वीर मुरारबाजींच्या पराक्रमाच्या स्मृती मनात घोळवीतच आपण गडदर्शनाला सुरुवात करतो.


पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या खालील भागात काहीसा सपाटीचा भाग आहे. याला पुरंदरचा माची म्हणतात. ही माची तटबंदीयुक्त आहे. माचीच्या पश्चिमेकडून गाडीमार्ग येतो. या भागात पद्मावती तळे असून सैन्यासाठी स्वातंत्र्योत्तर बराकी व इतर इमारतीचे बांधकाम आहे. माचीच्या मध्यावर वीर मुरारबाजी यांचा पुतळा आहे. जवळच बिनी दरवाजा असून समोरच इंग्रजकालीन चर्चचे अवशेष आहेत. माचीवरुन पूर्वेकडे निघाल्यावर उजवीकडे पुरंदरेश्वराचे मंदिर आहे. पुरंदरेश्वर ही गडदेवता आहे. याच्या दारात पाण्याचे टाके आहे. बाजूला एक चहापानाची सोय असलेली एक टपरीही आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ आहे. या माचीवर सैनिकांच्या सोयीसाठी केलेल्या बांधकामामध्ये शिवकालीन बांधकामे पूर्णपणे नामशेष झालेली आहेत. पुरंदरेश्वराजवळूनच बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. बालेकिल्ल्यावर जाण्याअगोदर बाजूचा वज्रगड प्रथम पहाणे सोयीचे होईल. आपण वज्रगड-पुरंदर मधील भैरवखिंडीकडे चालू लागल्यावर डावीकडे आपल्याला भक्कम बांधणीचा तलाव लागतो. याचे नाव राजाळे तळे असून हा तलाव व पद्मावती तलाव हे शिवाजीराजांनी बांधलेले आहेत. किल्ला लढविताना दारूगोळ्यांबरोबरच गडावर पाण्याचा साठा मुबलक असावा लागतो. म्ह़णूनच या मोठ्या तलावांची निर्मिती महाराजांनी त्या काळी केली होती. भैरवखिंडीमध्ये शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण डावीकडील बराकीकडे चालू लागतो. शेवटच्या बराकीच्या मागून वज्रगडाकडे जाणारी पायवाट आहे. सोप्या चढणीच्या मार्गाने आपण वज्रगजडाच्या दरवाजामध्ये पोहोचतो. हा दरवाजा भक्कम बांधणीचा असून उत्तराभिमुख आहे.


वज्रगडावर पोहोचून आपण भैरवखिंडीच्या वरच्या कड्यावर आल्यावर येथून पुरंदर किल्ल्याचे लक्षवेधक दृष्य येथून दिसते. याच भागातून दिलेरखानाने पुरंदरवर तोफा डागल्या होत्या. वज्रगडावर पाण्याची टाकी, घरांचे अवशेष, ढासळत चाललेली तटबंदी, तसेच पूर्व टोकावरील महादेवाचे मंदिर असे सर्व पहाण्यासाठी अर्धा तास पुरतो. हे पाहून आपण पंधरा मिनिटांमध्ये पुन्हा भैरवखिंडीमध्ये येतो.


भैरवखिंडीतून माचीकडे निघाल्यावर डावीकडील वाट पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे खाली पुरंदरेश्वर दिसतो. ही वाट कड्याला भिडल्यावर कड्यामध्ये लक्ष्मीची देवळी आहे. याच्या थोडे वर उत्तराभिमुख असलेला दिल्ली दरवाजा किंग सर दरवाजा म्हणून ओळखला जाणारा दरवाजा आहे. या दरवाजा समोरही तटबंदी असल्यामुळे खालून तटबंदीवर तोफांचा मारा होणे अशक्य आहे.


दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍याच्या जागा आहेत. येथून वर आल्यावर डावीकडे कंदकड्याकडे वाट जाते. हा भाग तटबंदीने युक्त असा आहे. उजवीकडे देखणा असा ढाल दरवाजा दिसतो. याचा एक बुरूज भला थोरला असून दुसरा त्या मानाने खूप लहान आहे. त्यामुळे प्रवेशदाराजवळ शत्रू आल्यास मोठया बुरूजावरुन त्यावर हल्ला करता येतो. या मार्गाशिवाय येथून पुढे जाताच येत नाही. या दरवाजातून आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आत घरांचे अवशेष आपल्याला दिसतात. समोर दोन उंच टेकड्या दृष्टीस पडतात. यातील पहिली म्हणजे राजगादी आणि दुसरी केदार टेकडी.


राजगादीच्या खालच्या बाजूला भक्कम तटबंदी आहे. त्यामुळे येथून वर येणे अशक्यप्राय आहे. या तटबंदीला अनेक बुरुज आहेत. यातच प्रसिध्द असा शेंदर्‍या बुरूज आहे. राजगादीच्या माथ्यावर राजवाडा होता. त्याचे काहीही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. येथेच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. राजगादीच्या डावीकडून जाणार्‍या पायवाटेने आपण केदार टेकडीकडे चालू लागतो तेव्हा डावीकडील कड्याच्या पोटात ठराविक अंतरांवर असलेली अनेक पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात. या टाक्या जवळून खाली केदार दरवाजाकडे जाणारी वाट आहे. ही वाट तशीच पुढे फत्ते बुरुजाकडून कोकण्या बुरूजाकडे जाते.


राजगादीच्या डावीकडील वाटेने राजगादी ओलांडून पुढे आल्यावर समोर केदार टेकडीवर जाणार्‍या रेखीव बांधणीच्या पायर्‍यांची वाट आहे. टेकडीच्या माथ्यावरील केदारेश्वराचे मंदिर आपल्या नजरेला स्पष्ट दिसून लागते. या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला भक्कम अशा भींती बांधून ही वाट अतिशय सुरक्षित केलेली आहे. पायर्‍या चढून आपण पुरंदरच्या सर्वेच्च माथ्यावर पोहोचतो. येथे वाहणार्‍या भन्नाट वार्‍याने भर उन्हातही थकवा जाणवत नाही. केदारेश्वराच्या दारात नंदी मंडप आहे. तसेच येथे दीपमाळ आहे. केदारेश्वराचे दर्शन घेऊन आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो तेव्हा आजूबाजूचा विशाल प्रदेश आपल्या दृष्टीला मोहवून टाकतो. येथून आपण चौफेर दृष्टी फिरवल्यास कानिफनाथ, दिवे घाटाचा माथा, सोनोरीचा किल्ला, ढवळेश्वर, भुलेश्वर, जेजूरी, कर्‍हे पठार, समोरच असलेला वज्रगड, वीरचा जलाशय, शिरवळचा परिसर, खंबाटकी घाट, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वराचे पठार, विचित्रगड ऊर्फ रोहिडा, राजगड, तोरणा, सिंहगड, गोकूळ, वृंदावन तसेच लक्ष्मी ही भुलेश्वर रांगेतील शिखरे तसेच शेजारील सूर्य व चंद्र शिखरे प्रेक्षणीय वाटतात.


सह्याद्रीचे मनमोहक रुप आपल्या नजरेत घेऊन आणि मनात साठवून आपण पायर्‍या उतरायला लागतो. येथून आल्या वाटेने परत जाता येते अथवा केदार दरवाजाने उतरून भैरवखिंडीतूनही पुरंदर माचीमध्ये येता येते. माचीमध्ये आल्यावर पुन्हा एकदा आपल्याला वीर मुरारबाजींचे दर्शन घडते. तेव्हा या नरवीरासमोर आपण नतमस्तक होतो आणि त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या निष्ठेला, स्वामीकार्याला एक मानाचा मुजरा करुन आपला आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान घेऊनच बिनी दरवाजातून परतीच्या मार्गावर निघतो.


पुरंदर उंची - १३९० मीटर ( समुद्रसपाटीपासून)
पुणे-सासवड-पुरंदर - ५० किलोमीटर
पुणे- कापूरहोळ -पुरंदर - ५५ किलोमीटर
सातारा-कापूरहोळ-पुरंदर - ९५ किलोमीटर


गडावर जेवणाची व राहण्याची सोय नाही. योग्य सोय पायथ्याच्या नारायणपूर येथे अथवा सासवड येथे होऊ शकते.

आमनेरचा किल्ला

आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोडतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये हा किल्ला आहे.


आमनेरचा किल्ला तापीनदी आणि गडगा नदी यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर बांधलेला आहे. आमनेर किल्ल्याच्या जवळचे गाव म्हणजे भोकरबर्डी हे होय. भोकरबर्डी हे गाव बुर्‍हाणपूर ते अमरावती (धारणी मार्गे) या मार्गावर आहे.

आमनेरला जाण्यासाठी दोन मार्ग ओत. पहीला मार्ग म्हणजे जळगाव-भुसावळ-बुर्‍हाणपूर-भोकरबर्डी असा आहे. दुसरा मार्ग अमरावती-परतवाडा-सेमाडोह-धारणी-भोकरबर्डी असा आहे.

भोकडबर्डीमध्ये शाळा आहे. ही शाळा धारणी-बुर्‍हाणपूर या गाडी मार्गावर आहे. धारणीकडून आल्यावर शाळा डावीकडे लागते. या शाळेच्या समोरूनच एक कच्चा मार्ग जातो. या कच्च्या मार्गाने दोन किलोमिटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या माळरानावर मारूतीचे लहानसे मंदिर आहे. येथून आमनेर किल्ला दिसू लागतो. येथील पाऊलवाटेने पुढे चालत गेल्यावर गडगा नदीचे पात्र आडवे येते. नदी पात्रातून पाणी कमी असल्यास नदी ओलांडण्यास अडचण येत नाही. नदीला पाणी असल्यास नदी ओलांडणे धोकादायक ठरु शकते.

गडगा नदीच्या काठावरुन आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला आमनेर हे नाव जवळ असलेल्या आमनेर गावावरुन मिळाले आहे. हे आमनेर गाव ब्रिटीश आमदनीत उठून गेले. गाव उठून गेल्यामुळे त्या गावाची वाटही मोडून गेलेली आहे.

गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणार्‍या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो.

गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.

गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपर्‍याला चार आणि मधे दोन दोन बुरुज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरुन नदीचे उत्तम दर्शन होते. या बुरुजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणार्‍या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.

आमनेरचा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत इतिहास कळत नाही. बाहेरुन सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला लागलेला दिसतो. दुर्लक्षीत आणि दुरावस्थेत गेलेला आमनेरचा किल्ला मनाला चटका लावून जातो.

स्‍वराज्याची राजधानीः रायगड

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे.

मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या.

एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळजवळ ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठिण आणि अवघड आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २६ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर हा किल्ला उभा आहे. सभोवताली पर्वतराई, खोल दऱ्या आणि भुरळ घालणारी निसर्ग यामुळे हा किल्ला शोभिवंत दिसतो. या किल्ल्याचा भक्कमपणा, त्याची उंची, अवघड जागा आणि अजिंक्यतारा पाहून युरोपियन लोक त्यास `पूर्वेकडील जिब्रॉल्टर' म्हणतात.

किल्ल्यावर आजही गंगासागर तलाव, बालेकिल्ला, नगारखाना, राज दरबार, रंगमहाल, जगदीश्वर मंदिर या वास्तू आपल्याला पहायला मिळतात. महाराजांचे समाधीस्थळ ही तर रायगडावरील एक पवित्र निशाणी होय.

शिवप्रताप राजाचा प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते.


उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.


''जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि 'आ' रानमोळी''


अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.


अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.


असं म्हणतात की, १६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.


प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. ''होता जिवा म्हणून वाचला शिवा'' या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.


प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.

बाजीप्रभुंच्‍या पराक्रमाचा साक्षीदार पन्‍हाळा

महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांच्या शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे कथन करणारा किल्ला म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते. किल्ल्याची उंची ही सुमारे ४०४० फूट आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तुलनेत अधिक उंचावर असल्याने देशभरासह विदेशातील पर्यटकही येथे मोठ्या संख्‍येने भेट देत असतात.

शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आलेला हा किल्‍ला सुरवातीला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. 'पन्नग्रालय' या नावाने हा क‍िल्ला पूर्वी ओळखला जात होता. अफजलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1700 शतकात पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली परंतु अठराशेमध्ये किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात होता.

शिवरायांच्‍या कार्याची आठवण करूण देणा-या पन्हाळगडचे स्‍वराज्‍याच्‍या उभारणीत मोठे योगदान आहे. सिध्दी जोहरने महाराजांच्या पन्हाळगडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळी रात्री या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडकडे रवाना झाले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला त्‍यावेळी बाजीप्रभु देशपांडे यांनी पावनखिंडीत त्याला रोखून धरले आणि आपल्‍या अतुलनीय पराक्रमाने इतिहास घडवला. त्‍यामुळेच शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडापर्यंत पोचू शकले.

या गडावरील अनेक ठिकाणे शिवरायांच्‍या इतिहासाची साक्ष देतात. ही ठिकाणे आपल्‍या नजरेत साठवून घेण्‍यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. मुंबई-पुणेकराची तर विकेंडला येथे मोठी गर्दी असते. भिजपावसात पन्हाळगडावर जाण्‍याची मजाच काही औरच असते.

राजवाडा

पन्हाळगडावरील ताराबाईंचा राजवाडा प्रेक्षणीय असून त्यात असलेली प्राचीन देवघरं ही अतिशय देखणी आहेत. सध्या या वाड्यात नगरपालिका कार्यालय व पन्हाळा हायस्कूलच्या मुलांचे वसतीगृह आहे.

सज्जाकोठ

शिवरायांच्या गृप्त वार्ताचा साक्षीदार असलेला कोठीवजा इमारत म्हणजेच सज्जाकोठ. संभाजी राजे येथून संपूर्ण प्रांताचा कारभार पाहत होते.

राजदिंडी

गडावर राजदिंडी नावाची एक दूर्गम वाट आहे. या वाटेनेच शिवराय सिध्दी जौहरला चकवून विशालगडाकडे रवाना झाले होते.

किल्‍ल्‍यात असलेल्‍या अंबारखान्‍यात गंगा, यमुना व सरस्वती अशी तीन धान्याची कोठारे आहेत. त्यात वरी, नागली आणि भात भरला जात होता.

चार दरवाजा

चार दरवाजा हा पन्हाळगडा वरील मोक्याचा व महत्त्वाचा दरवाजा होता. येथे शिवा ‍काशिद यांचा पुतळा आहे. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा त्यांनी तो पाडून टाकला होता. त्याचे अवशेष अजून येथे आहे.

संभाजी मंदिर

गडावर एक छोटी गडी व दरवाजा असून तेथे संभाजी मंदिर आहे. मंदिर परिसर विलोभनीय आहे.

महालक्ष्मी मंदिर

राजवाडातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस 1000 वर्ष पुरातन महालक्ष्मी मंदिर आहे. भोज राजाचे कुळदैवत होते, असे म्हणतात.

तीन दरवाजा
पन्हाळगडवरील पश्चिमेला असलेला हा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे.

बाजीप्रभुंचा पुतळा
एस टी स्थानकावरून थोडे पुढे गेले असता वीररत्‍न बाजीप्रभु देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा दृष्‍टीस पडतो.

कसे पोहचाल?
पन्हाळगडावर जाण्‍यासाठी सगळयात जवळचे रेल्वेस्थानक, बसस्थानक कोल्हापूर येथे आहे. चार दरवाजा व तीन दरवाजामार्गे किल्ल्यावर जाता येते.

कोल्हापूर येथून पन्हाळगड 45 किमी अंतरावर असून एसटी व खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थेट गडावर सोडतात.

स्वराज्याचे तोरण: तोरणा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांमध्ये तोरणा एक महत्त्वाचा किल्ला आहे. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या मावळातून कानंदी नावाची नदी वाहत असल्यामुळे या खोर्‍याला कानंद मावळ असे नाव मिळाले.

तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हा गाव आहे. पुणे ते वेल्हा हे अंतर साधारण साठ कि.मी. आहे. पुण्यातून कात्रज - शिवापूर - नसरापूर - वेल्हा असे जाता येते. पुणे ते वेल्हा अशा एस.टी.बसची सोय आहे. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. राजगड किल्ल्याकडून तसेच भट्टी या गावातूनही गड चढता येतो. परंतु वेल्हा येथून जाणे सोयीचे आहे.


तोरणा किल्याची उंची समुद्रसपाटीपासून १४०५ मीटर (४६०५ फूट) इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला असून त्याच्या ताशीव अशा सरळसोट कातळ कड्यामुळे तो बेलाग झालेला आहे. त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते.

विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये तोरणा किल्ला होता. शिवरायांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ येथेच रोवली. या किल्ल्याचा ताबा घेतल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना मोहरांनी भरलेले हंडे शिवाजी महाराजांना मिळाले. या धनाचा वापर त्यांनी तोरण्याची दुरुस्ती आणि राजगड किल्ल्याच्या उभारणीसाठी केला. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

औरंगजेब बादशहाला तोरणा किल्ला जिंकून घ्यावा लागला. कुठल्याही भेदनितीला तोरणा बळी पडला नाही. पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला. भारत स्वतंत्र्य झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारतात दाखल झाला.

वेल्हा गावाच्या पश्चिमेकडे तोरणा किल्ल्याचा एक डोंगरदांड आलेला आहे. या डोंगरदांडावरून गडावर जाणारी वाट आहे. या वाटेने साधारण दीड दोन तासामध्ये आपण तोरणागडावर पोहोचतो. वाटेमध्ये कोठेही पाणी नाही. या डोंगरदांडाने चढून आपण कातळकड्यांना भिडतो. कातळकड्यांमध्येच तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीचा दरवाजा ओलांडून आपण पुढे गेल्यावर कोठीचा दरवाजा लागतो. कोठीच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला तोरणाजाईचे मंदीर लागते. येथेच महाराजांना मोहरांचे हंडे सापडल्याच्या नेंदी आहेत. जवळच तोरण टाळे व खोकड टाके आहे. खोकड टाक्यामधील पाणी पिण्या योग्य आहे.

या टाक्यापासून थोडे चढल्यावर आपण पोहोचतो ते बालेकिल्ल्यामध्ये. येथे मेंगाईदेवीचे देऊळ आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये उध्वस्त झालेल्या वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. दिवाणघर आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पाहता येते. येथून एक वाट पूर्वेकडील बुरुजावर जाते. या बुरुजावरुन आसमंत उत्तमप्रकारे पाहता येतो. सिंहगड, पुरंदर, वज्रगड, राजगड, राहिडा, रायरेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड असा विस्तृत प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये येतो. बुरुजाच्याखाली निमुळत्या दांडावर बांधलेली झुंझारमाची अप्रतिम आहे. बुरुजाच्या डावीकडून माचीवर जाणारी अवघड वाट आहे. या वाटेवर सध्या एक लोखंडी शिडी बसवलेली आहे.

मेंगाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर कड्यात मेंगाई नावाचे पाण्याचे टाके आहे. मंदिरापासूनच एक वाट कोकण दरवाजाकडे जाते. कोकणाच्या दिशेला असल्यामुळे या दरवाजाला कोकण दरवाजा असे नाव आहे. येथून बुधला माचीचे विलोभनीय असे दर्शन घडते. घसार्‍याच्या या वाटेने जाताना कातळात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. येथून एक वाट भगत दरवाजाकडे जाते, तर उजवीकडील वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाकडील आणि उजवीकडील वाटेने आपल्याला राजगडाकडे जाता येते.

उजवीकडील वाटेने गेल्यावर बुधल्याचा सुळका डावीकडे रहातो. हा सुळका चढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. खाली डावीकडे बाळणजाई दरवाजा आहे. पुढे चित्ता दरवाजा कापूरलेणे व घोडेजिनचे टोक आहे.

जॉन डग्लस या इंग्रजाने जेव्हा तोरणा पाहिला त्यावेळी त्याने sinhagarh is lions den the Torana is
Eagle`s nest असे उदगार काढले.

तोरणा किल्ल्याबाबत असलेला महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हातमखानाचे पत्र. या पत्रातून तोरण्याचे जे वर्णन आले आहे ते मनोरंजक वाटेल. मोगलांनी तोरणा घेतल्यानंतर तोरण्यावर किल्लेदार म्हणून हातमखानाची नेमणूक करण्यात आली. त्याला किल्लेदारखान अशी पदवीही देण्यात आली. हातमखानाने आपला गुरू अताउल्ला याला लिहिले. त्याचा सारांश असा, ``आता मी या किल्ल्याची हकीकत सांगतो. मी साहेबजाद्यांचा निरोप घेवून निघालो. मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहिसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याच्या एका बाजूला खोल दरी आहे. ती दरी म्हणजे अलफलुस्साफलीन (सप्त पाताळातील अगदी खालचा असलेला नरक) असे वाटते. किल्ल्यावर पुढे जाण्यास वाट नाही. येथे जाण्यास डोंगरात पायर्‍या काढल्या आहेत. त्याही अतिशय ओबडधोबड आहेत. धडधाकट, तरुण, मजबूत आणि चपळ माणसेही त्या पायर्‍या चढून जाईपर्यंत काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हातार्‍याची काय कथा? या किल्ल्याची वाट अतिशय वेडीवाकडी आहे. हा किल्ला म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. अशा अवघड वेड्यावाकड्या वाटेने किल्ल्यावर कोणीही चढून दाखवा म्हणावे.``

स्थान : किल्ला तोरणा, ता.वेल्हा, जि.पुणे
उंची : १४०५ मीटर समुद्रसपाटीपासून
मार्ग :
१. पुणे - शिवापूर - नसरापूर - वेल्हा
2. सातारा - शिरवळ - नसरापूर - वेल्हा
पुणे व वेल्हा ६० कि.मी. सातारा ते वेल्हा १०० कि.मी.

तोरणा किल्ल्यावर राहण्याची व जेवणाची सोय नाही. पावसाळ्या व्यतिरिक्त मेंगाई मंदिरात राहता येईल. पुणे येथे राहण्याची सोय उत्तम होऊ शकेल.

१) तोरणा ! कानदखोर्‍यात हा गड आहे. खूप उंच, उंच, उंच ! तोरण्याइतकी उंच गड तोरणाच. डोंगरी किल्ल्यात त्याचे स्थान वडीलपणाचे. तोरणा जसा उंच तसाच रूंदही आहे. गडाला दोन माच्या आहेत. एक झुंजार माची. दुसरी बुधला माची. माची म्हणजे उपत्यका. उपत्यका म्हणजे गडाच्या एखाद्या पसरत गेलेल्या पहाडावर केलेले कोटबंद बांधकाम. झुंजार माचीपासून बुधला माचीचा शेवटचा बुरूज जवळजवळ कोसभर दूर आहे. एक कोस लांब व पाव कोस रूंद असा गडाचा पसारा आहे. बुधला माचीवर मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे, व त्यावर खूप मोठा थोरला धोंडा आज शतकोशतके बसून राहिला आहे. तो दिसतो तेलाच्या बुधल्यासारखा म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात.

२) झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. येथून गडाखाली उतरावयास एक वाट आहे. परंतु ती इतकी भयंकर आहे की, स्वर्गाची वाटही इतकी अवघड नसेल ! या वाटेवरून जाताना अर्धे बोट जरी झोक गेला तरीही दया-क्षमा होणार नाही मृत्यूच ! त्या दृष्टीने स्वर्गाला ती वाट फार जवळची आहे ! महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंगतीत तोरणाचा मान पहिला लागावा. काळेकुट्ट अन् ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरूंद वाटा, भक्कम दरवाजे, काळ्या सर्पासारखी वळसे घेत, गडावर कडेकडेने गेलेली तटबंदी. मधून मधून बांधलेले व अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या मध्यावर बालेकिल्ला, असे तोरण्याचे रूप आहे!

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.